Kavitecha Paan - Sandeep Khare And Vaibhav Joshi

profile
Tushar D Kadam
Jun 15, 2019   •  776 views

वाचा कवितेचं पान मध्ये म्हटल्या गेलेल्या सर्व कविता!

Read the lyrics of each and every poem recited in Kavitecha Paan.

कवितेचं पान हा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये बऱ्याच सुंदर कविता ऐकायला भेटतात. पण त्या ऐकता ऐकता पाहायला भेटल्या तर आनंद द्विगुणित होतो. मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे प्रत्येक एपिसोड मधल्या कवितांचा संच. एकाच पानात. हे सगळं फक्त कवितेच्या प्रेमापोटी.

तर चला आठवूया तो एपिसोड जिथे आपले सर्वांचे लाडके संदीप खरे आणि वैभव जोशीआले होते. या भागामध्ये म्हटल्या गेलेल्या सर्व कविता आपल्या साठी खाली सादर केल्या आहेत. या कविता त्या कवी व कवयित्रींची प्रतिभा आहे आणि त्याचा सन्मान आपण राखुया.

So, I would like to present you the poems recited by Sandeep Khare and Vaibhav Joshi in Kavitecha Paan.

source:Kavitecha Paan Youtube channel

KAVITECHA PAAN | कवितेचं पान - Episode # 9

Sandeep Khare & Vaibhav Joshi reciting own poems

संदीप खरे आणि वैभव जोशी काव्यवाचन

कवी : संदीप खरे, वैभव जोशी

Concept & Direction : Madhurani Gokhale - Prabhulkar

Camera : Prasad Jadhav,Alankar Misal,Vinay Rawal,Omkar Patil

Editing : Deepak Kolekar
Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.

----------------------------------------------------------------------------------------------------

देव कुठं आहे?

कवी: वैभव जोशी

पूर्वी कसं की तू दिवसाच्या कुठल्याही प्रहरी

एखाद्या वडापिंपळाखाली पडीक असायचास,

देव नाही, फकीर वाटायचास,

दगडी नाही, जिवंत दिसायचास |

येता जाता लोक तुझ्या शेजारीच घडीभर विसावायचे,

शिदोरी उघडून दोन घास स्वतः खायचे,

दोन घास तुला द्यायचे.

म्हणजे कसं की देवाणघेवाण असायची

म्हणजे कसं की एक आदानप्रदान असायचं |

तसं तर तेव्हाही तू शेंदरी रंगाचे वैगरे डगले घालायचास,

पण कसं की वेषांतर केलेला राजा वाटायचास,

थेट प्रजेत मिळून मिसळून वावरायचास,

कसं की त्या निमित्ताने तुझ्याही कानावर यायचा रयतेचा हालहवाल,

आमचं सुखदु:ख हाच तुझा अबीर गुलाल |

म्हणजे कसं की तुझ वेगळेपण तेव्हाही लपून राहायचं नाही,

पण कसं की आपुलकीच्या निर्झरातून कोरडेपण वाहायचं नाही,

कधीही बघू शकायचो तुझ्या डोळ्याला डोळा भिडवून.

वेळ वखत काही काही बंधन नव्हतं

तुही सगळ्यांना सामावून घ्यायचास,

डोळ्यात तुझ्या ‘मी’ पण नव्हतं

म्हणजे कसं की ते मी पण आता तुझ्यात आलंय

असं मुळीच नाही म्हणायचय,

पण कसं की हल्ली भेटतच नाहीस मुळी उराउरी

म्हणजे मग एखाद्याने काय समजायचं |

म्हणजे कसं की विनोदीच होऊन बसलंय सगळं

बघ ना म्हणजे कसं की विनोदीच होऊन बसलंय सगळं

आपल्या दोघांनाही भेटीची ओढ आहे

मधलाच कुणीतरी मनावर घेत नाही,

आम्हाला आत जाता येत नाही

तुला बाहेर येता येत नाही |

की पूर्वी कसं की तू दिवसाच्या कुठल्याही प्रहरी

एखाद्या वडापिंपळाखाली पडीक असायचास,

देव नाही, फकीर वाटायचास,

दगडी नाही, जिवंत दिसायचास

तुलाही राजमहालात जायचं नसावं

पण तू राहायला गेलायेस हे मात्र खरं

मग आम्हीपण जरा बुजाल्यागत झालो

म्हटलं आपण बरं आपलं सुखदु:ख बरं

पूर्वी कसं की तू-आम्ही

म्हणजे कसं की राजा-रयत—हालहवाल

म्हणजे कसं की आमचं सुखदु:ख तुझा अबीर-गुलाल

म्हणजे कसं की निर्झर ओलावा

आता कसं की मिरवणूक देखावा

म्हणजे कसं की जयघोष कल्लोळ

म्हणजे कसं की देवस्थान मंडळ घोळ

पूर्वी कसं की तु-आम्ही-आपणच फक्त

आता कसं की डोळाभरून बघण्यावरही पहारा असतो सख्त

म्हणजे कसं की, पूर्वी कसं की, आता कसं की

थोडक्यात असंय बघ सगळं ||

आता वाटतं की

कवी: संदीप खरे

आता वाटतं की नऊ नऊ महिने घेणार एक एक शब्द यायला

आता वाटतं भरभरून द्यावसं वाटावं, असं नाहीच काही द्यायला

एका भाबड्या प्रामाणिकपणे सारंच मांडत आलो इतके दिवस

आता वाटतं – नको होतं सारं इतक्या लग्बगीने सांगायला

आता वाटतं की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ,

कसे सचैल भिजायचो इतके दिवस – मजा वाटते आहे !

काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा

अस्वस्थ वाटते आहे, लेखणीची भीती वाटते आहे …

आता वाटते इतका अधाशीपणा नको होता करायला

थोड्या धीराने घेतलं असतं, तर उरलीही असती श्रीशिल्लक काही

आता परत काही नवे वाटून घेण्यासाठी नवा प्रवास

प्राणात खोल शोधतोय त्राण; गवसत नाही !

भरून आला होतात काठोकाठ त्या मेघांनो – क्षमा !

बहरून आला होतात त्या उद्यानांनो – क्षमा !

झाली असेल कुचराई एखादा थेंब झेलण्यात, फूल खुडण्यात

पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होते आहे !

पक्षी कुठेही उडत असो, क्षितिजाकडेच उडत असतो

यावर आता विश्वास ठेवायचा फक्त …

हाताची घडी घालून, शांतपणे मिटायचे डोळे

थंड झालं तर पाणीच होतं म्हणायचं,

आणि उसळलंच तर म्हणायचं रक्त !

एक होकार दे

कवी: वैभव जोशी

एक होकार दे, फार काही नको

फार काही नको, फक्त 'नाही' नको |

एकदा दोनदा ठीक आहे सखे

तुझे लाजणे असे बारमाही नको |

थेट स्पर्शातुनी बोल काहीतरी

गूढ शब्दातली नेहमी मौन ग्वाही नको |

आपले भेटणे हीच एक कोजागिरी

मग चांदणेही नको, चांदवा ही नको |

तुज बघता सारा

कवी: संदीप खरे

तुज बघता सारा हिशेब चुकला होता

मी अमावास्येला चंद्र पाहिला होता

तो एकच झाला गुलाब अवघा लाल

जो ओठांवरती तुझ्या टेकला होता

तालात नादली तुझी पैंजणे तिकडे

हृदयाचा ठोका इकडे हुकला होता

डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा

मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता

निथळता चांदणे असह्य अंगावरती

मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता

तू मिठीत घेता श्वास थांबले होते

मज मारायचा डाव चांगला होता

पाहिले जयाने तुझे लाजरे हासू

माणूस तो आयुष्यातून उठला होता

चढणार होते जहर तुला हे माझे

मी कवितेतून दंश ठेवला होता

एक कवितेची ओळ

कवी: वैभव जोशी

imagesource: pinterest.com

लवकरच..

आता दोन वांजोटे प्रश्न!

अबोली कुडता, हिरवी ओढणी

----------------------------------------------------------------------------------------------------

तर कसा वाटला तुम्हाला माझा हा प्रयत्न?

I hope you enjoyed the lyrics of the poems recited in this episode of Kavitecha Paan.

जर आवडला असेल तर जास्तीत जास्तीत लोकांपर्यंत हा लेख पोहोचवा. त्यांना उपयोगी पडेल.

6  6